अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढली , ईशान्येश्वर मंदिरांचे पुजारी चौकशीच्या फेऱ्यात, कोणाचं भिंग फुटणार?

नाशिक: नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात यांच्यावर अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे.विशेष तपास पथकाद्वारे सुरू असलेल्या चौकशीत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ईशानेश्वर मंदिरांच्या पुजाऱ्यांचा समावेश असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन अशोक खरात याच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची आता विशेष तपास पथकाद्वारे कसून चौकशी केली जाणार आहे. यामध्ये फार्म हाऊसवरील मजूर, सुरक्षा रक्षक आणि विशेषतः ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्याचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
खरात याच्या फार्म हाऊसवर असलेल्या ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्याची चौकशी हा या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या मंदिरात आणि फार्म हाऊसवर नक्की कोणत्या प्रकारचे व्यवहार किंवा ‘कारनामे’ चालत होते याची माहिती या कर्मचाऱ्यांकडे असण्याची शक्यता विशेष तपास पथकाला आहे. त्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

अशोक खरात याच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर, त्याच्या फार्म हाऊसवर अनेक संशयास्पद हालचाली होत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. आता विशेष तपास पथकाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. यातून फार्मस वर कोण कोण लोक येत होते? छुपा पद्धतीने काय चालत होते?आणि महिलांबाबतच्या तक्रारींमध्ये तथ्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे या चौकशीतून मिळण्याची दाट शक्यता आहे.