हायव्होल्टेज लढतीचा निकाल समोर, राष्ट्रवादीच्या निवृत्ती आण्णा बांदल यांचा विजय, शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा पराभव…

पुणे : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा काल निकाल लागला आणि काही जागा वगळता सर्व्तर भाजपाच्या विजयाचे कमळ फुललेलं दिसलं. सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आणि भाजप-सेनेच्या युतीचाच मुंबईत महापौर दिसणार हे चित्र स्पष्ट झाले. महापालिकतील ठाकरेंची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपने अखेर विजयी पताका फडकावली आहे.

तसेच पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४१ मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा पराभव झाला आहे. या प्रभागातील निवडणूक निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. प्रभाग ४१ मध्ये समाविष्ट गावातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती बांदल आणि श्वेता घुले यांनी विजय मिळवला आहे.
तर महंमदवाडी भागातून भारतीय जनता पक्षाचे अतुल तरवडे आणि प्राची आल्हाट हे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी दोन जागांवर यश मिळवले असून शिवसेनेला मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. महंमदवाडी-उंड्री भागातील मतमोजणीला रात्री उशिरा सुरुवात झाली होती. सकाळपासूनच कार्यकर्ते एसआरपीएफ येथील मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमले होते.

निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. मतमोजणीला विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांची चुळबुळ वाढली होती. मात्र हळूहळू निकाल स्पष्ट होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात..
दरम्यान, आपल्या उमेदवारांचा विजय झाल्याची बातमी कानावर पडताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. काही कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही दिसून आले. दीर्घ काळ चाललेल्या प्रचार, मेहनत आणि संघर्षाचे चीज झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
