हडपसरच्या दस्तनोंदणी कार्यालयाचे होणार स्थलांतर! अनेक दिवसांनंतर झाला निर्णय…
पुणे : हडपसर येथील (हवेली क्रमांक 3) दस्तनोंदणी कार्यालयाच्या स्थलांतरावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुद्रांक शुल्क आणि नियंत्रण विभागातील अधिकार्यांनी सोलापूर बाजार, ससाणेनगर यासह इतर दोन ते तीन ठिकाणी जागांचा शोध घेतला. यापैकी सर्व सोईसुविधांसह योग्य जागा निवडून कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.
हडपसर येथील हवेली क्रमांक-3 हे दस्तनोंदणी कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून अनागोंदी कारभारामुळे चर्चेत आले होते. बोगस खरेदीखत करण्यात अग्रेसर असलेल्या या कार्यालयातील सबरजिस्ट्रार कोट्यधीश, तर शिपाई आणि खासगी संस्थेचे कर्मचारी तसेच वकीलही लखपती झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्या सबरजिस्ट्रारच्या मोठ-मोठ्या कारनाम्यांमुळे त्यांची बदली करण्यात आली.
त्यानंतर आलेल्या दुसर्या सबरजिस्ट्रारने तर कहरच केला. एका दिवसात शंभर ते दीडशे बेकायदा खरेदीखते केली.
त्यांच्या या अवगुणामुळे मुद्रांक शुल्क आणि नियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी हवेली क्रमांक-3 या दस्तनोंदणी कार्यालयास टाळे टोकले. गेल्या तीन महिन्यांपासून हे कार्यालय बंद आहे.
अर्थात, या प्रकारामुळे हडपसरसह मुंढवा, घोरपडी, फुरसुंगी, वडकी या आसपासच्या भागातील नागरिकांची मात्र गैरसोय झाली आहे. बंद करण्यात आलेले कार्यालय सुरू करावे, यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिली.
दरम्यान, मुद्रांक शुल्क विभागातील अधिकार्यांनी त्यास नकार दिला, अशी माहिती या विभागातील अधिकार्यांनी दिली आहे.