बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याचं कारण? सुप्रिया सुळे यांनी कोणावर फोडलं खापर?

बारामती : बारामतीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचारासंदर्भात सूचक भूमिका मांडली आहे. आपण एक मतदार म्हणून बारामतीला मतदान करायला जाणार आहोत. अजित पवार गटाने प्रचारात उतरण्याबाबत विचारलं, तर विचार करू. शेवटी रिश्ते मायने रखते है, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती)च्या उमेदवार म्हणून मैदानात आहेत.
राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवत काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे. खासदार सुप्रिया सुळे या आज पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बारामतीतून सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून येतील, याबाबत विचारणा करण्यात आली असता, सुळे यांनी थेट उत्तर देणे टाळले. महाराष्ट्रातील बळीराजाला सुख, शांती आणि समाधान मिळू दे, इतकंच विठ्ठलाला साकडं घातलं आहे, असे त्या म्हणाल्या.

यामुळे सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य मताधिक्याबाबत ठोस भाष्य करण्यापासून सुप्रिया सुळे यांनी दूर राहण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. याबाबत नक्की काय घडले? असं विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न अजित पवार गटाला विचारा असं उत्तर दिलं.
राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांना अप्रत्यक्ष लक्ष्य करत निवडणूक बिनविरोध न होण्याचे खापर सुळे यांनी त्यांच्यावर फोडलं. राजकारण होत असतं. सत्ता पैसा येतो जातो. मात्र सुख, दुःखात कुटुंबच आणि माणसंच कामी येतात. त्यामुळे बारामती निवडणुकीत सुनेत्रा वाहिनीच्या मागे… रिश्तेही मायने रखते है… असं म्हणत आपण सोबत असल्याचही सुळे म्हणाल्या.