आंदोलकांचा जीव वाचवणे हाच पोलिसांचा उद्देश, जालना लाठीमारावर चित्रा वाघांचे अजब उत्तर..
जालना : जालना जिल्ह्यातील अंबडमधील अंतरवाली सराटी येथे चार दिवसांपासून आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर शुक्रवारी जोरदार लाठीमार झाला. यामुळे राज्यात संतप्त वातावरण निर्माण झाले असून याचे ठिकठिकाणी पडसाद उमटू लागले आहेत.
सरीकडे एरव्ही विरोधकांवर तुटून पडणाऱ्या भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ या घटनेवर, मात्र काहीशा बचावाच्या पवित्र्यात गेल्या आहेत. विरोधी पक्ष या घटनेचे राजकारण करीत असल्याचा दावा त्यांनी केलाय. आंदोलकांचा जीव वाचविण्याचा पोलिसांचा उद्देश होता, असे देखील यावेळी ते म्हंटल्या.
तसेच मराठा आंदोलनकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली, असा दावाही त्यांनी घटनास्थळी न जाताच केला आहे. ही घटना दुर्दैवी आहे, एवढेच त्यांनी म्हटले आहे. मात्र, तिचा निषेध केलेला नाही.
कालच्या प्रकारात पोलिसांवरही हल्ला झाला असून, यात १२ पेक्षा अधिक पोलिस जखमी झाल्याचे सांगत वाघांनी एकप्रकारे राज्य सरकारचीच बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच समाजात तणाव निर्माण होत असताना त्यांचं विरोधकांकडून जे खालच्या दर्जाचं चुकीचं राजकारण केलं जातं आहे, असा आरोप केला आहे.
कुठल्या गोष्टीचं राजकारण करावे याचे तारतम्य त्यांनी ठेवायला हवे, राजकारण करण्याची ही वेळ नाही, असा उपदेशाचा डोसही पाजला आहे. एखाद्या समाजाचं कल्याण हा कुणाच्याही राजकारणाचा विषय होऊ नये, एवढी प्रगल्भता विरोधकांकडून अपेक्षित आहे. त्यामुळे जालन्यातल्या दुर्दैवी घटनेचा वापर करून स्वतःची पोळी शेकण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, असेही त्या म्हणाल्या.