भिगवण परिसरात पोलीसच आले अडचणीत! ऊसतोड वाहतुकीचे पैसे बुडवले म्हणून कामगाराला ताब्यात घेतले, कामगाराचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

बीड : बीड जिल्ह्यातील एका हमाल कामगाराच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत नाथा पांडुरंग कवटेकर (वय 56, रा. पिंठी, ता. पाटोदा, जि. बीड, सध्या रा. गडी सहकारी साखर कारखाना, ता. गेवराई, जि. बीड) यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी फिर्यादी विनोद नाथा कवटेकर (वय 33, व्यवसाय – हमाली, रा. विठी, ता. पाटोदा, जि. बीड, सध्या रा. गडी सहकारी साखर कारखाना, ता. गेवराई) यांनी ही तक्रार दाखल केल्यानंतर भिगवण पोलीस ठाण्यात गु.र.नं 235/2025 अंतर्गत दोन आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत पोलीस दलात असलेल्या तुषार दराडे याच्यासह बाळू खाडे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही इंदापूर तालुक्यातील अकोले गावचे रहिवासी आहेत. घटनेत दिलेल्या माहितीनुसार २१ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रीपासून २२ सप्टेंबर रात्री ९ वाजेपर्यंत मौजे अकोले (ता. इंदापुर, जि. पुणे) येथे ही घटना घडली.

फिर्यादीचे वडील नाथा कवटेकर यांना आरोपींनी उसाच्या टोळीकरिता दिलेल्या १ लाख रुपयांच्या रकमेच्या परतफेडीच्या कारणावरून जबरदस्तीने बसवून ठेवले. त्यांच्यावर मानसिक दबाव आणत सतत तणाव दिला. या दरम्यान, त्यांनी फोन-पे द्वारे ५७ हजार रुपये दिले, मात्र उर्वरित रकमेबाबत आरोपींचा दबाव कायम राहिला. नाथा कवटेकर यांना आधीपासून कमी रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असल्याची माहिती असूनही आरोपींनी त्यांना मानसिक छळ देत राहिले.
त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. मात्र, योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी तुषार दराडे आणि बालु खाडे यांच्या वर्तनामुळे आणि हलगर्जीपणामुळेच नाथा कवटेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी BNS कलम 105, 127(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पाटील करत आहेत. या प्रकरणामुळे भिगवण परिसरात खळबळ माजली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
