आसमंतात भक्ती नामाचा गजर अनुभवित संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लोणीकाळभोर नगरीत विसावला …!
उरुळी कांचन : विठ्ठलाच्या भेटीसाठी आसुसलेला लाखो वारकऱ्यांचा पालखी सोहळा देहू नगरीतून पुणे मुक्कामाहुन ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विठ्ठल मंदिरात बुधवारी (ता. १४) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विसावला आहे.
पालखी सोहळा लोणी काळभोर मार्गस्थ होण्यापूर्वी लोणी स्टेशन चौकात पोहोचताच पालखीचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू काळभोर, लोणी काळभोर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सचिन काळभोर यांनी केले.
पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्यासाठी विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. लोणीस्टेशन येथील छोटा विसावा संपवून पालखी सोहळ्याने सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर गावात प्रवेश केला.
पालखी लोणी काळभोर गावात पोहोचताच शिवशक्ती भवनजवळ पालखीचे स्वागत साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य सनी काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले. हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा किरण काळभोर, हभप विनोद महाराज काळभोर यांनी विठ्ठल मंदिराजवळ स्वागत केले.
दरम्यान, पालखी सोहळा मुक्कामासाठी लोणी काळभोर येथे संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोहोचला. रात्रभर चाललेल्या भजन, किर्तन, जागर, प्रवचन व हरिनामाच्या जागरामुळे संपूर्ण लोणी काळभोर परिसर विठ्ठलमय होऊन गेला आहे. दरम्यान पालखी सोहळ्याचा अनुपम उत्सहात लोणीकाळभोर करांनी वारकऱ्यांसाठी मोठी व्यवस्था केली आहे.