जाचक बापूंनी रात्रीचा दिवस केला अन् छत्रपतीला आले ‘अच्छे दिन’, 6 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण, आता 12 लाखांकडे वाटचाल…

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर सध्या वेगाने गाळप करत असून कारखाना पूर्वीचे वैभव प्राप्त करत आहे. साखर कारखान्याच्या ऊस गाळपाची वाटचाल ६ लाख मे. टन पूर्ण केले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडचणी असलेला हा कारखाना सध्या मोठी भरारी घेत आहे.

यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी बारकाईने कामकाज बघून तसेच योग्य नियोजन करत हा टप्पा पार केला आहे. या हंगामात १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज 78 दिवसांमध्ये सहा लाख क्रशिंग होत आहे स्वतः चेअरमन, व्हॉइस चेअरमन संचालक रात्रीचे बसून काम पहात आहेत.
थंडी वारा असला तरी रात्रंदिवस जातीने लक्ष घालून सतत आठ हजारच्या पुढे गळीत करण्याचे काम केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात छत्रपती कारखाना पुन्हा आपली वाट सुरळीत करेल असा विश्वास सभासदांना आहे. सर्व कर्मचारी देखील माझा कारखाना माझी जबाबदारी या हेतूने काम करत आहेत.

कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे तसेच सर्व संचालक मंडळ दिवस-रात्र कारखान्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. प्रत्यक्ष कारखान्यात जाऊन कामकाजाची पाहणी केल्यामुळे गाळप प्रक्रियेला गती मिळाली आहे. सध्या कारखान्याचे दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या प्रमाणात ऊस गाळपास दिल्यामुळे गाळपाचे आकडे समाधानकारक पातळीवर पोहोचले आहेत. सध्या सर्वच साखर कारखान्यांमध्येही ऊस गाळपाची स्पर्धा वाढली असली, तरी छत्रपती सहकारी साखर कारखान्याने आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक ऊस मिळविण्यावर भर दिला आहे. कार्यक्षेत्रातील ऊस देखील बाहेर जात नसल्याने हंगाम जास्त दिवस चालणार आहे.
ऊस उत्पादकांना पुढील काळातही कारखान्यालाच ऊस गाळपास घालण्याचे आवाहन केले आहे. सद्यस्थितीत श्री छत्रपती कारखान्याचे हंगामअखेरीस १२ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा आशावाद परिसरातून व्यक्त होत आहे. यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यात देखील छत्रपतीने मोठी आघाडी घेतली आहे.
