मोठी बातमी! अविश्वास प्रस्ताव अखेर फेटाळला, मोदी सरकार पुन्हा एकदा जिंकले…
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने नरेंद्र मोदी सरकारविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव आज लोकसभेत फेटाळला गेला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार टीका टिप्पणी बघायला मिळाली. राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला.
विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर 8 ऑगस्टपासून सलग तीन दिवस चर्चा झाली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर उत्तर दिले. यानंतर या प्रस्तावावर मतदान झाले.
दरम्यान, मणिपूर घटनेमुळे मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर संसदेत नियम २६७ अन्वये चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, या मागणीसाठी विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभापासून आक्रमक भूमिका घेतली होती.
काँग्रेसने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. पक्षाचे खासदार गौरव गोगोई यांनी ५० खासदारांच्या सह्यांनिशी हा प्रस्ताव लोकसभा सचिवालयाकडे दिला होता. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभसंकेत असल्याचे पीएम मोदींनी विरोधकांना प्रत्युत्तर देत म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नऊ वर्षांत दुसऱ्यांदा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जात आहे.