महावितरणचा पुणे परिमंडळाचा पुढील २५ वर्षांचा प्रस्ताव तयार ! पुणे मंडळात २२० केव्ही चे तब्बल १४ अति उच्च केंद्र भासणार..!!


पुणे : पुणे परिमंडलामध्ये वाढती ग्राहक संख्या व विजेची मागणी पाहता सन २०५० पर्यंत दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी २२० केव्हीचे १४ तर १३२ केव्हीचे ३ अशा १७ अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांची आवश्यकता असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेमध्ये ३७ नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली आहे .

पुणे परिमंडलामधील विविध कामांचा सोमवारी (दि. १) रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात आढावा घेताना मुख्य अभियंता राजेंद्र पवार बोलत होते. अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त), ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) यांची प्रमुख उपस्थिती होती.

आढावा बैठकीत मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले की, पुणे परिमंडलामध्ये सन २०२३ मध्ये विक्रमी २ लाख ६ हजार ४६८ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. याआधी नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग दरमहा १५ ते १६ हजार होता तो १९ ते २० हजारांवर गेला आहे. महसूलामध्ये १४.४ टक्के तर वीजबिल वसूलीमध्ये १४.८ टक्के वाढ झाली आहे. अचूक बिलिंगचे प्रमाण १.५४ टक्क्यांनी वाढून ते ९५.२३ टक्क्यांवर गेले आहे. वितरण व वाणिज्यिक हानी सध्या ७.६४ असून मागील वर्षांत ०.३६ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षांत तब्बल ३९७१ छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांची भर पडली असून सन २०२२ च्या तुलनेत ४४ टक्के वाढ झाली आहे. तर १८ ठिकाणी महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित झाल्याची माहिती त्यांनी दिली.

पुणे परिमंडलामध्ये नागरीकरण मोठ्या वेगाने होत आहे. जागेच्या उपलब्धतेचा प्रश्न मोठा असल्याने भविष्यातील विजेच्या स्थितीचा वेध घेऊन पायाभूत वीजयंत्रणेचे नियोजन करण्यात यावे अशी सूचना मुख्य अभियंता पवार यांनी केली.

पुढील २५ वर्षांचे धोरण

पुणे परिमंडलातील २०५० पर्यंतच्या वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता अतिउच्चदाबाचे किमान १७ उपकेंद्रांची उभारणी आवश्यक आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात २२० केव्हीच्या बालेवाडी, चऱ्होली, वाघोली, रिव्हरव्ह्यू मगरपट्टा, ताथवडे, मोशी, बावधन, म्हाळुंगे, रोहकल, गहुंजे, कडूस, कोलतेपाटील नेरे हिंजवडी, मांजरी, सेक्टर १२ प्राधीकरण तसेच १३२ केव्हीच्या खानापूर, कात्रज, भूगाव नॉलेज सिटी येथील अतिउच्चदाब उपकेंद्रांचा समावेश आहे अशी माहिती मुख्य अभियंता श् पवार यांनी दिली. यातील चऱ्होली व सफारी पार्क येथील अतिउच्च्दाब उपकेंद्र उभारण्यास तसेच भोसरी सेन्चुरी एन्का अतिउच्चदाब उपकेंद्रात ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याबाबत महापारेषणकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

तसेच राज्य शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेमध्ये पुणे परिमंडलासाठी ५५७० कोटी ८९ लाख रुपये खर्चा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये ३७ नवीन उपकेंद्र, नवीन २३ पॉवर ट्रॉन्सफॉर्मर तसेच इतर कामांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले. पुणे परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत व ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) तत्पर ग्राहक सेवा देण्यासाठी अधिक सजग व सज्ज राहावे असे निर्देश राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!