ताम्हिणी घाटातील अपघाताचं गुढ उकललं ; 6 जिवलग मित्रांच्या मृत्यूचा हॉटेल चालकामुळे उलगडला थरार….

पुणे : ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. पुणे -माणगाव मार्गावर मंगळवारी हा अपघात झाला.आता या ताम्हिणी घाटात झालेल्या दुर्दैवी अपघाता मागचं गुढं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास पुण्यातील ६ तरुण कोकणात फिरण्यासाठी निघाले होते. सहलीची पूर्वतयारी म्हणून या तरुणांनी कोकणातील एका हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्या होत्या. मात्र ठरलेल्या वेळेत पर्यटक हॉटेलवर वेळेवर पोहोचले नाहीत. बुधवारी सकाळी हॉटेलचालकाने त्यांच्या मोबाइलवर वारंवार फोन केले, पण कोणाचाच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून हॉटेलचालकाने पुण्यातील या तरुणांच्या एका मित्राला फोन लावला आणि सहा जण अद्याप पोहोचले नसल्याचे सांगितले.दरम्यान बुधवारी संध्याकाळी मुलांचा फोन लागत नसल्याने तरुणांपैकी एका मुलाच्या वडिलांनी पुण्यातील उत्तमनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पुढे माणगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. यादरम्यान या सहा जणांचे मोबाइल बंद असल्याने त्यांचे शेवटचे लोकेशन तपासले असता ते ताम्हिणी घाटातील दिवा अंधार परिसरात आढळले.
दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, घाटातील तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट ५०० फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात गाडीमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी रेस्क्यू टीमने जीव पणाला लावून ५०० फूट खाली उतरून ६ मृतदेह बाहेर काढले.अपघातात मृत्युमुखी पडलेले सहा तरुण पुण्यातील कोंढवे परिसरातील रहिवासी होते. यात प्रथम चव्हाण (वय २२), पुनीत शेट्टी (वय २०), साहिल बोटे (वय २४), महादेव कोळी (वय १८), ओंकार कोळी (वय १८) आणि शिवा माने (वय १९) यांचा समावेश होता. दरम्यान कोकणातल्या त्या हॉटेलचालकाचा कॉल आला नसता तर हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले नसते.

दरम्यान हा अपघात रात्रीच्या सुमारास घडल्याने अंधारात कोणाच्या लक्षात आलं नसावं असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अजूनही तपास करत आहेत. या अपघाताचं मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही.