कुख्यात गुंड गजा मारणेसोबतची’ मटण पार्टी’ पडली महागात ;5 पोलिसांवर मोठी कारवाई,आता 2 वर्ष….

पुणे:पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला अटक करून सांगली कारागृहात नेत असताना ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ देणं पुणे पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलंच महागात पडलं आहे.या हलगर्जीपणामुळे एका सहायक पोलीस फौजदारासह चार पोलीस कर्मचाऱ्यांवर दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याची कठोर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड गजा मारणे याला मटण बिर्याणी खाऊ घालणे पुणे पोलिसांच्या चांगलचं अंगलट आलं आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणेला अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याला सांगली कारागृहात हलवण्यात येत होतं. यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक शासकीय वाहनातून रवाना झालं होतं. याच प्रवासादरम्यान पोलिसांनी केलेला हलगर्जीपणा त्यांच्या अडचणी वाढवणारा ठरला.
पोलिसांनी गुंडाला दिलेल्या या विशेष वागणुकीमुळे आणि कर्तव्यात कसूर केल्यामुळे, या कर्मचाऱ्यांवर तातडीने चौकशी करण्यात आली. तपासानंतर, संबंधित पोलिसांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. यानंतर पुणे पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस फौजदार आणि चार कर्मचाऱ्यांवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे त्यांना पुढील दोन वर्षे वेतनवाढ मिळणार नाही.

दरम्यान गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला अशा प्रकारे शासकीय वाहनात ‘व्हीआयपी’ सुविधा पुरवणे आणि त्याच्या साथीदारांना भेटू देण्यासारख्या गंभीर बाबींची दखल घेत पोलीस प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे.

