बाप नावाचा डोंगर कोसळला! पाया पडले…मिठी मारली…अजितदादांच्या पार्थिवापाशी जय आणि पार्थ पवारांचा टाहो

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बारामतीत एकवटला आहे. राज्यासह देशातील बडे नेते बारामतीत दाखल झाले असून संपूर्ण वातावरण अत्यंत शोकाकुल झाले आहे.

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय या दोघांनी अंत्यसंस्कार विधी पार पाडल्या. यावेळी एका क्षणामुळे वातावरण आणखीच भावूक झाले.
आज सकाळी अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. अखेरचे दर्शन घेण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे रवाना झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले नागरिक शांतपणे आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देत होते, तर मैदानावर हजारो लोक आधीच उपस्थित होते.

राज्यभरातून तसेच देशातील विविध भागांतून अनेक प्रमुख नेते बारामतीत दाखल झाले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. कायम कार्यरत, शिस्तप्रिय आणि वेळेचे काटेकोर पालन करणारे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचे पार्थिव मैदानात पोहोचताच उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळू लागले आणि वातावरण अधिकच भावनिक झाले.
अंत्यसंस्कार विधी अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी पार पाडले. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर जय पवार यांनी वडिलांच्या चरणी नतमस्तक होत त्यांना मिठी मारली. हा क्षण पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली आणि अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. पार्थ पवार देखील या वेळी अत्यंत भावूक झाले होते, आणि संपूर्ण परिसरात शांतता व वेदना एकाच वेळी जाणवत होत्या.
दरम्यान, अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी बारामतीला येणार होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करत असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
