आई रक्ताच्या थारोळ्यात अन् शेजारी अनोळखी तरुण…चिमुरडीने शाळेतून घरी आल्यावर जे पाहिलं त्यानंतर सगळेच हादरले…

जळगाव : एका 40 वर्षांच्या विवाहित महिलेच्या घरात घुसून युवकाने तिच्या डोक्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडा येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

हा युवक शिरपूर तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अक्कुलखेडा गावात ही महिला पती आणि दोन मुलांसह वास्तव्यास होती. आज सकाळी सुमारे दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान तिची मुलगी शाळेतून घरी परतली. घराचा दरवाजा उघडताच आत रक्ताच्या थारोळ्यात दोघांचे मृतदेह पडलेले दिसून आले.

हा भयानक प्रकार पाहून मुलीने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर मुलीला मोठा धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. प्राथमिक तपासात दोघांच्या डोक्याला गावठी कट्ट्याने गोळी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, याच पार्श्वभूमीवर ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण तपास झाल्यानंतरच घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले.