तारीख ठरली! मुंबईचा महापौर ‘या’ तारखेला ठरणार, पडद्यामागे मोठ्या हालचाली…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महानगरपालिका निवडणुकीची सगळीकडे चर्चा होती. या निवडणुकीत राज्यभरात एकूण 29 महापालिकांसाठी निवडणूक झाली होती. या सर्व महापालिकांपैकी मुंबईची महानगरपालिका चर्चेच्या केंद्रस्थानी होती.

कारण या पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली जात होती.
मुंबई पालिकेच्या निवडणुकीमुळे या दोन्ही भावांच्या युतीची ऐतिहासिक घटना घडली. परंतु या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असतानाच आता मुंबईच्या महापौरपदी नेमकं कोण बसणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

ही उत्सुकता आता संपलेली आहे. कारण येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईकरांना त्यांचा नवा महापौर मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या महापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व नियमांची पूर्तता करत ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी मतदान होईल. त्याच दिवशी निकाल जाहीर होऊन मुंबईला नवा महापौर मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निवडणूक निकालानंतर संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. हा निर्णय राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्यामुळे महापौरपदाबाबत अंतिम चर्चा काही काळ रखडली होती. मात्र, फडणवीस मुंबईत परतल्यानंतर भाजप आणि शिंदे गटामध्ये बैठका झाल्या असून, त्यातून महापौर निवडीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील अंतर्गत समन्वयानुसार ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांवर शिंदे गटाचा प्रभाव राहणार असून, मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
