आली लग्नसराई ; दागिने घालताना घ्यावी ही काळजी, ‘या’ गोष्टी मनाशी करा पक्क्या

पुणे : सोनसाखळी पळवली, मंगळसूत्र ओढले, बेशुद्ध करून दागिने लंपास केले यासारख्या बातम्या आपल्याला सातत्याने ऐकायला, वाचायला मिळतात. त्यातच आता लग्नसराई असल्याने हे प्रकार वाढीस लागले आहेत.

म्हणूनच हे लक्षात घ्या…
शक्य तितके कमी दागिने घालणं, हा सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा उपाय. पण एखाद्या वेळेस काही निमित्ताने दागिने घातलेत तर तेवढ्या वेळापुरते व त्या ठिकाणीच दागिने घाला.

एवढं करूनही जर तुमच्यावर वाईट प्रसंग आलाच तर हे सगळे दागिने खोटे आहेत, त्यामुळे कोणी घेतले तरी मला त्याचे दुःख नाही, असे ठणकावून आणि न घाबरता सांगता यायला हवे. यामुळे आपला काही फायदा नाही हे कळताच चोर तुम्हांला सोडून देतील. याशिवाय सुरक्षिततेचे कोणते उपाय अवलंबाल याविषयी.
– सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकटंदुकटं फिरताना हल्लीच्या दिवसात सोन्याचे दागिने घालूच नयेत.
– तुमच्या सोसायटीच्या परिसरात किंवा लिफ्टमध्ये तुम्ही खूप सुरक्षित आहात अशा भ्रमात राहू नका व सजगतेने वागा.
– रस्त्यावर उभं राहून अघळपघळ गप्पा मारू नये. कारण तुमचं बोलणं कोण ऐकेल आणि त्याचा कसा गैरवापर करेल, याची काहीच खात्री देता येत नाही.
– पगार किती, काय नवीन खरेदी केली किंवा बडेजाव अजिबात मारू नका. याचा फायदा घेणारे अनेक जण असतात.
– परिसरात अनोळखी व्यक्ती फिरत असल्यास सुरक्षा व्यवस्थेला किंवा
पोलिसांना कल्पना द्यावी. शक्य झाल्यास तरुणांच्या मदतीने हटकावे.
– संशयास्पद काही आढळले, कोणी तुमच्याशी सलगी करायला लागले आणि हे चुकीचं आहे असं लक्षात आलं, तर जवळच्या व्यक्तीला फोन करा व चालू ठेवा. म्हणजे तुम्ही कुठे, कसे आहात हे त्या व्यक्तीला कळेल व काही गैर वाटले तर ती व्यक्ती लगेच तुमच्या मदतीला धावून येईल.