पुण्यातील रेल्वे स्टेशनचा भार कमी होणार ; तळेगाव ते उरळी 9 रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार

पुणे: पुण्यातील रेल्वे स्थानकावर नेहमीच मोठ्या गर्दीचा ताण असतो, पण आता हा ताण लवकरच कमी होणार आहे. जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आता तळेगाव ते उरळी हा प्रस्तावित दुहेरी मार्ग येत्या 4 वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावर 9 रेल्वे स्टेशन असतील आणि 160 किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावतील. यामध्ये न्यू तळेगाव, वराळे, संत तुकाराम महाराज, कुरुळी (चाकण), संत ज्ञानेश्वर महाराज, वाघोली, कोलवडी, कुंजीरवाडी कॅबिन, उरळी (बायपासमार्गे) हे स्टेशन प्रस्तावित आहेत. यामधील न्यू तळेगाव रेल्वे स्टेशन मुख्य स्थानक असणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी हडपसर आणि खडकी या दोन टर्मिनलचे काम सुरू आहे. तसेच तळेगाव ते उरळीदरम्यान बाह्यवळण मार्ग तयार करण्याचे नियोजन असून या मार्गाच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. कंपनीने सादर केला आहे. हा 80 किलोमीटरचा मार्ग दुहेरी असून, तो तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांचा असणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावर एकूण 9 रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान पुणे रेल्वे स्टेशनचा विकास करून रिमॉडेलिंग करण्यात येणार आहे. यामध्ये स्थानकावरील फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे. त्याचा फायदा लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणार आहे. तसेच या प्रकल्पासोबत रेल्वे मार्ग वाढवण्याचे देखील नियोजन आहे.
