पुण्यातील भीमाशंकर मंदिरात शिंदे गटाच्या नेत्याचा कारनामा; थेट पुजाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण…..

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. मंदिरातील पुजाऱ्यालाच लाथा बुक्क्यांनी मारहाण शिवसेना शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या कृत्याचा राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, योगेश शिर्के असे या पुजाऱ्याचे नाव असून कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भाविकांचा सुरू असलेला अभिषेक संपत आला होता. अभिषेक करताना होणारी आरती सुरू होती. अभिषेक सुरू असताच दरेकर व त्यांचे सहकारी दर्शनासाठी मंदिरात जाऊन भाविकांच्या मागे उभे राहिले.
गाभाऱ्यात गर्दी होत असल्याने त्यावेळी मंदिरात पुजारी असणाऱ्या योगेश शिर्के यांनी दरेकर यांना दर्शन घेऊन बाहेर जाण्याची विनंती केली. तर दरेकर यांनीही शिवलिंगाची पूजा करण्याची व शिवलिंगावर पाणी घालण्याची इच्छा व्यक्त केली.यावरून दरेकर व पुजारी योगेश शिर्के यांच्यात जोरदार वाद झाला.

या मंदिर गाभाऱ्यातच दरेकर यांनी पुजाऱ्याला शिवीगाळ केली. मंदिर गाभाऱ्यातून बाहेर पडल्यानंतर देविदास दरेकर यांनी पुजारी योगेश शिर्के यांना मारहाण केली. यावेळी इतर पुजाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाढ मिटवला. मात्र पुजाऱ्यांनी कोणतेही तक्रार केली नसल्याने तर्क वितर्क लावले जात आहेत.

