युद्धाचा परिणाम थेट खिशावर! गॅसनंतर पेट्रोल दर वाढले; नागरिकांना बसणार आर्थिक फटका…


पुणे : मध्यपूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव तीव्र झाला असून त्याचे पडसाद आता जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटू लागले आहेत. या परिस्थितीचा थेट परिणाम इंधन पुरवठा आणि दरांवर होत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतातही पेट्रोलियम कंपन्यांनी प्रीमियम इंधनाचे दर वाढवले आहेत.

आज, 20 मार्चपासून पुणे शहरातील नागरिकांना स्पीड आणि पॉवर पेट्रोलसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. देशात गॅस दरवाढीनंतर आता पेट्रोलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. ‘स्पीड’ आणि ‘पॉवर’ सारख्या प्रीमियम पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

नवीन दरांनुसार, स्पीड/पॉवर पेट्रोलसाठी प्रति लिटर 2.09 रुपयांची वाढ करण्यात आली असून, त्यामुळे दर 111.68 रुपयांवरून वाढून 113.77 रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. दरम्यान, साध्या पेट्रोलचे दर मात्र पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत.

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता जागतिक कच्च्या तेलाच्या बाजाराला बसत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने इंधन दरांवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याने तेल उत्पादन आणि वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.

त्यातच गेल्या काही दिवसांत ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.या सर्व घडामोडींमुळे जागतिक तेल बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचे परिणाम विविध देशांतील इंधन दरांवर होत आहेत.

दरम्यान, इराणने होर्मुझची खाडी मार्गे होणाऱ्या तेल पुरवठ्यावर निर्बंध घातल्याचे समोर आले आहे. या महत्त्वाच्या जलमार्गात पुढील काळात अडथळे निर्माण झाल्यास जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक या मार्गाने होत असल्यामुळे या भागातील तणावाचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होऊ शकतो. हा संघर्ष असाच सुरू राहिल्यास, भविष्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!