पुण्यात कृरतेचा कळस ; जन्मदात्या आईनेच पहाटे मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरला, मुलीवरही भयंकर वार…

पुणे : पुण्याच्या वाघोली परिसरात जन्मदात्या आईने स्वतःच्या पोटच्या ११ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या 13 वर्षाच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केला.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास सर्वजण घरात झोपेत असताना आरोपी आईने धारदार शस्त्राने ११ वर्षांच्या मुलावर हल्ला केला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिने आपल्या १३ वर्षांच्या मुलीवरही वार करण्यास सुरुवात केली.मात्र घाबरलेल्या अवस्थेतील मुलीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला. तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. ज्यामुळे तिचे प्राण वाचले.
दरम्यान या जखमी मुलीला शेजारच्या लोकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आईला ताब्यात घेतले आहे. जन्मदात्या आईने आपल्याच मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न का केला? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान हा प्रकार कौटुंबिक वादातून घडला की आई मानसिक तणावाखाली होती, याचा तपास पोलीस करत आहेत. वाघोली परिसरात घडलेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
