क्रूरतेचा कळस! चारित्र्याच्या संशयावरून पुण्यातील विवाहितेला धमकी, छळ आणि अमानुष मारहाण…

पुणे :गेल्या काही दिवसापासून चर्चेत आलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुण्यात विवाहितेच्या आत्महत्या, मानसिक छळ याबाबतच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत.अशातच आता पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील एका विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून आणि हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री हितेश पारगे असं त्या विवाहितेचे नाव आहे.तिचा पती हितेश याने भाग्यश्री यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना वारंवार चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर सोन्याची अंगठी आणि चांदीच्या भांड्यांची मागणी करत त्यांचा छळ करण्यात आला.विरोध केल्यास माहेरच्या मंडळींना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
भाग्यश्री या विवाहितेला इतका छळ करण्यात आला कि, या त्रासादरम्यान आरोपींनी भाग्यश्री यांचे मंगळसूत्र आणि मोबाईल हिसकावून घेत त्यांना गंभीर दुखापत केली.अखेर सासरच्या जाचाला कंटाळून पीडित महिलेने सासवड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान या तक्रारीवरून सासवड पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
