आखाती युद्धाने गृहिणींचे बजेट कोलमडले!आधीच गॅस मिळेना आता तेलही महाग झालं, आता कितीला मिळणार?

मुंबई: गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या इराण आणि इस्राईलच्या युद्धामुळे सर्वसामान्यांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. आधीच LPG गॅस सिलिंडर मिळत नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत. रेशनिंगच्या दुकानावर रॉकेलसाठी रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे चुलीवर जेवण करण्याची वेळ आली आहे. अशातच आता खाद्यतेलाचे दरही महागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

तेलाचे भाव वाढल्यामुळे आता पाच लीटर -दहा लीटरच्या कॅनमागे गृहिणींना जास्त पैसे मोजावे लागतील त्यामुळे आता पैशांचा हिशोब मांडताना बजेट कोलमडणार आहे. सोयाबीनच तेल 1 मार्च रोजी 143 रुपयांना मिळत होतं आता 166 रुपयांना मिळणार आहे. पामतेल जे 140 रुपयांना मिळत होतं ते आता 153 रुपयांना मिळणार आहे. तर सूर्यफूल तेल जे 165 रुपयांना मिळत होते ते आता 185 रुपयांना मिळणार आहे. करडई तेल 330 रुपयांना मिळत होते ते आता 360 रुपयांना मिळणार आहे.
आखाती युद्धाचा थेट परिणाम जसा इंधन, गॅसवर झाला तसाच तेलावर देखील झाला आहे. खाद्य तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे वडापाव, भजीपाव सारख्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. महागाईच्या झळा थेट सर्वसामान्य लोकांच्या खिशाला बसणार आहेत.

आखाती युद्धामुळे एलपीजी गॅस मिळत नसल्याने छोटे व्यवसाय LPG वर जे अवलंबून आहेत ते बंद पडले आहेत. आता तेलाचे भाव देखीव वाढले आहेत. खाद्य तेलाचे दर वाढल्यामुळे बाकीच्या गोष्टींचे दर वाढले आहेत. या आठवड्याभरात खाद्यतेलाचे दर एकूण 25 रुपयांनी महाग झाले आहेत.