महायुतीला मोठा धक्का बसणार, राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत; लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता..

पुणे : राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांनी आपआपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

मात्र अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये.याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली असून महायुतीला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांनी आपापल्या पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, या निवडणुका आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वतंत्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत. काही जागांवर अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. पण आमचा पहिला पर्याय महायुतीच आहे.मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बोलताना पटेल म्हणाले, नगरपरिषद आणि महानगरपालिका या स्थानिक स्तरावरील निवडणुका असतात. यात अनेक कार्यकर्त्यांची उमेदवारीची इच्छा असते.
मोठ्या निवडणुकांमध्ये महायुती शक्य आहे, पण या छोट्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून स्वतंत्र लढलेलं बरं. त्यातून कार्यकर्त्यांना न्याय मिळतो. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘एकला चलो रे’ चा नारा देणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी या निवडणुका कशा लढवणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यातच राज ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत युती होण्याच्या चर्चांना जोर आलेला आहे.