पुणे हादरलं! तरुणीला जबरदस्ती कारमध्ये बसवलं, गळाही दाबला अन्…
पुणे : पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका २३ वर्षीय तरुणाने १९ वर्षीय तरुणीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
तू माझ्याबरोबर का बोलत नाही, माझ्याशी बोल नाहीतर तुला जीवे मारून टाकेन, अशी धमकी देत आरोपीनं पीडित तरुणीचा गळा दाबला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.
आजीम आयुब मुलाणी असं २३ वर्षीय आरोपीचं नाव असून तो वडकी येथील रहिवाशी आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी आजीम आयुब मुलाणी हे एकाच परिसरात राहतात. त्या दोघांची चांगली मैत्री होती. पण पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला आरोपीबरोबर बोलण्यास मज्जाव केला होता.
तू त्याच्याबरोबर बोलू नकोस, अशी ताकीद पीडितेला देण्यात आली होती. त्यामुळे त्या आरोपीबरोबर बोलत नव्हत्या. तरीही आरोपीनं अनेकवेळा फोन करुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित तरुणीने त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.
तसेच २२ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी रवीदर्शन चौकात थांबली होती. त्यावेळी आरोपी आजीम याने पीडितेला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून अॅमनोरा मॉलमध्ये घेऊन गेला.
तिथे आरोपीनं ‘तू माझ्याशी का बोलत नाही? तू जर माझ्याशी बोलली नाहीस, तर मी तुला जीवे मारेन अशी धमकी देत गळा दाबण्याचा प्रयत्न केला.आरोपीच्या तावडीतून सुटून तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.