मार्चमध्ये दिसणार वर्षातील पहिलं चंद्रग्रहण! सुतक काळ, तारीख आणि अचूक वेळ आत्ताच करा नोट…

पुणे : 2026 हे वर्ष खगोलीय घटनांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. या वर्षातील पहिलं ग्रहण हे आज लागलं असून थोड्याच दिवसात आणखी एक ग्रहण लागणार आहे. यावर्षी एकूण 4 ग्रहणे होतील ज्यात दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणांचा समावेश आहे.

वर्षातील पहिले ग्रहण अलीकडेच झाले असून, आता अवघ्या काही दिवसांत आणखी एक महत्त्वाची खगोलीय घटना घडणार आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेले सूर्यग्रहण भारतातून दिसले नव्हते.
मात्र मार्च महिन्यात लागणारे वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतातून स्पष्टपणे पाहता येणार असल्याने खगोलप्रेमी आणि श्रद्धाळूंसाठी ते विशेष ठरणार आहे. त्यामुळे या ग्रहणाची तारीख आणि वेळ आत्ताच नोंदवून ठेवणे आवश्यक आहे.

मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण फाल्गुन पौर्णिमेला येत असून त्याच दिवशी होलिका दहन आणि होळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीने या ग्रहणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी 2:16 वाजता ग्रहणाचा उपच्छाया टप्पा सुरू होईल. मात्र भारतात चंद्रोदयानंतरच हे ग्रहण प्रत्यक्ष दिसू लागेल. त्यामुळे संध्याकाळी आकाशात चंद्र उगवल्यानंतरच नागरिकांना ग्रहणाचे दर्शन घेता येईल.
हे चंद्रग्रहण खग्रास स्वरूपाचे असले तरी भारतात चंद्रोदयाच्या वेळी ते आधीच सुरू झालेले असेल. त्यामुळे देशातील बहुतांश भागात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल. मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये ग्रहण आंशिक स्वरूपात पाहता येईल, तर ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ते अधिक स्पष्ट आणि प्रखर दिसण्याची शक्यता आहे.
संध्याकाळी अंदाजे 6:26 ते 6:47 या वेळेत भारतात ग्रहणाचे दर्शन होईल. या दरम्यान चंद्र गडद लालसर रंगाचा दिसू शकतो, म्हणूनच या प्रकाराला ‘ब्लड मून’ असेही संबोधले जाते.
हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे सुतक काळ पाळला जाणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुरू होतो. त्यानुसार 3 मार्च रोजी सकाळी 9:39 पासून सुतक काळ लागू होईल.
टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत thetime2time याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.