महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी होणार ‘या’ दिवशी जाहीर, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदारयादीत नव्याने कोणाचेही नाव समाविष्ट होणार नसले, तरी दुबार नावे,मृत मतदारांची नोंद वगळण्याबरोबरच यादीतील चुका टाळण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.

निवडणुकीची अंतिम मतदारयादी महापालिका प्रशासनाला २८ नोव्हेंबरला प्रसिद्ध करावी लागणार आहे. राज्यातील बहुतांश महापालिकांची मुदत सुमारे साडेतीन ते चार वर्षांपूर्वी संपली असून, तेव्हापासून प्रशासनाचा कारभार आयुक्तांच्या हाती आहे.

निवडणुका घेण्याची मागणी सतत होत असली तरी निर्णय लांबला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने हालचाल सुरू केली आहे.

तसेच आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार, महापालिका आयुक्तांनी प्रारूप मतदारयादी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये, महापालिका व प्रभाग समिती कार्यालयांच्या सूचनाफलकांवर तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या मतदारयादीऐवजी आयोगाने दिलेली अधिकृत यादीच वापरायची आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची विधानसभानिहाय मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे.
दरम्यान, या मतदारयादीत नव्याने नावे समाविष्ट केली जाणार नाहीत. केवळ दुबार नावे, मृत मतदार किंवा स्थलांतरित मतदारांची नोंद वगळून तसेच तांत्रिक चुका दुरुस्त करून यादी अंतिम करण्यात येईल. आयोगाने ही मतदारयादी महापालिकांना पाठवली असून, तिचे प्रभागनिहाय विभाजन करून प्रारूप मतदारयादी तयार केली जाणार आहे. या प्रारूप यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ६ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस निश्चित करण्यात आला आहे.
महापालिकांनी 28 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदारयादी आणि ४ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी जाहीर करावी लागेल. त्यानंतर १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदारयादी प्रकाशित केली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेसह सर्व महापालिकांना यादी तयार करताना दुबार नावे, मृत आणि स्थलांतरित मतदारांची नोंद वगळण्याच्या तसेच चुका टाळण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.
