कदमवाकवस्तीत कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक ! आठरा वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत ….
उरुळीकांचन : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर व दुचाकीच्यात झालेल्या अपघातात एका अठरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अंगूर वाइन च्या समोर शनिवारी (ता.14) सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सार्थक विकास बाहेती (वय 18, रा. सूर्या पार्क, गुजर वस्ती, कवडीपाट टोल नाक्याजवळ, कदमवाकवस्ती तालुका हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक बाहेती व त्याचा मित्र दुचाकीवरून त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त लोणी स्टेशनकडे दुचाकीवरून चालले होते. सार्थक हा गाडी चालवत होता तर त्याचा मित्र पाठीमागे बसला होता.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी, कदम वाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एचपी गेट समोर असलेल्या अंगूरवाईंच्या कॉर्नर जवळ आल्या असता त्यांच्या दुचाकीला कंटेनर ने जोरदार धडक दिली.
या अपघातात सार्थक हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या अंगावरून कंटेनर गेला. या अपघातात सार्थक हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. अशी माहिती मिळत आहे.