धुरळा उडणार! महापालिका निवडणुकीचा मास्टर प्लॅन ठरला, समोर आली तारीख

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मागील अनेक महिन्यापासून चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वात महत्त्वाच्या निवडणुका मानल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुका कधी जाहीर होणार याबद्दलची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने नुकताच सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर पालिका निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरूवारी सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या सोमवारी दुसरी आढावा बैठक घेण्यात येईल. त्यामुळे लवकरच निवडणूक जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे, महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांपैकी अनेक महानगरपालिका निवडणुकीची तयारी पूर्ण करत आहेत. मतदार यादीतील दुहेरी नोंदींची यादी तयार करण्यासोबतच इतर कामं देखील वेगाने सुरू आहेत. अनेक महानगरपालिकांचे असे म्हटले आहे की, ते अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या १० डिसेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी डुप्लिकेट मतदारांची ओळख पटवून देण्याचे आणि त्यांना चिन्हांकित करण्याचे काम पूर्ण करण्याचे वेळापत्रक पूर्ण करत आहेत.

दरम्यान महापालिका निवडणुका जानेवारीच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. तसंच, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना अजूनही महापालिका निवडणुका जानेवारीच्या मध्यात होण्याची अपेक्षा आहे. निवडणुका १५ डिसेंबरनंतर जाहीर होण्याची अपेक्षा आहे आणि त्या १५ ते १८ जानेवारी दरम्यान होऊ शकतात.

