बँकिंग क्षेत्रात नोकरीचं स्वप्न आता होणार पूर्ण! PNB मध्ये ‘एवढ्या’ हजार जागांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता..

नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या पदवीधर तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून पंजाब नॅशनल बँकने २०२६ साठी ५१३८ अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली आहे.

देशभरातील विविध शाखांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. PNB ने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि इच्छुक उमेदवार २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करू शकतात.
ही भरती देशातील विविध राज्यांतील बँक शाखांसाठी आहे. उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना उमेदवारांनी प्रथम वेबसाइटवर आपली नोंदणी पूर्ण करावी.

त्यानंतर वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक माहिती अचूक भरून अर्ज सादर करावा लागेल. निर्धारित शुल्क ऑनलाइन भरल्यानंतरच अर्ज अंतिम मानला जाईल. वयोमर्यादा १ जानेवारी २०२६ या तारखेप्रमाणे मोजली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी पदवी पूर्ण केलेली असावी. १ जानेवारी २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना बँकिंग व्यवहारांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून भविष्यातील स्थिर नोकरीसाठी ही संधी उपयुक्त ठरू शकते.
अर्ज शुल्क श्रेणीनुसार निश्चित करण्यात आले आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस पुरुष उमेदवारांसाठी ९४४ रुपये शुल्क आहे. महिला उमेदवारांना ७०८ रुपये भरावे लागतील. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी शुल्क २३६ रुपये ठेवण्यात आले आहे.