फोडामोडीचे संस्कार कोणाचे आहेत हे देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे, बावनकुळे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार..
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर गंभीर आरोप केला. त्या असं म्हणाल्या की भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन ते तीन वेळा फोडण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली.
ज्यानंतर भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळेंना थेट प्रत्युत्तर दिले.आम्ही कुणाचाही पक्ष फोडलेला नाही. फोडाफोडीचे संस्कार कुणाचे आहेत ते देशाला आणि महाराष्ट्राला माहित आहे. असं बावनकुळेंनी म्हटले आहे.
“आम्ही कुणाचाही पक्ष फोडण्याचे काम केलेले नाही. ते आमचे संस्कार नाहीत. असे फोडाफोडीचे संस्कार कुणाचे आहेत? हे देशाला आणि राज्याला माहित आहे. त्यांना त्यांचे संस्कार लखलाभ. इतरांचे पक्ष फोडण्याचे राजकारण ज्यांनी आयुष्यभर केले, आता तेच लोक आमच्यावर बोलत आहेत.
सुप्रिया सुळे या आमच्या ताई आहेत, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. मात्र स्वातंत्र्यानंतरचा इतिहास जरा पाहा, कुणी पक्ष फोडून सत्ता मिळवली ते समजेल.” असे सडेतोड प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिले आहे.