ताजमहलचे नाव बदलणार? केंद्र सरकारने केला मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर…

Taj Mahal नवी दिल्ली : आग्र्याचा जगप्रसिद्ध ताजमहल आणि त्याच्याशी संबंधित ‘तेजोमहालय’ वादावर अखेर केंद्र सरकारने संसदेत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ताजमहलचे नाव बदलण्याबाबत समाजमाध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना सरकारने पूर्णविराम दिला आहे.

राज्यसभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन ब्रिटास यांनी सरकारकडे ताजमहलचे नाव बदलण्याबाबत काही योजना आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
त्यांनी सांगितले की, ताजमहलचे नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारकडे आलेला नाही. तसेच असा कोणताही विचार सरकार करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ताजमहल हे भारताच्या जागतिक पर्यटनाचे मोठे आकर्षण असून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावरच सरकारचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संसदेत बोलताना मंत्री शेखावत यांनी गेल्या दहा वर्षांतील सरकारच्या कामगिरीचा आढावाही मांडला. त्यांच्या मते, देशातील ऐतिहासिक स्थळांच्या शोध, उत्खनन आणि संरक्षणासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. मागील सरकारच्या कालावधीच्या तुलनेत सध्याच्या काळात या क्षेत्रावर दुप्पट खर्च करण्यात आला आहे.
2004-2014 दरम्यान केवळ 1310 कोटी रुपये खर्च झाले होते. तर 2014-2014 या काळात 3713 कोटी रुपये संवर्धन कार्यासाठी खर्च केले गेले आहेत. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कॉर्पोरेट सेक्टरलाही सहभागी करून घेण्याची योजना सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.