लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन मिटलं! दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा…

पुणे : गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केला जातात.

मात्र ही योजना सुरू करत असताना सरकारने काही अटी घातल्या होत्या , ज्यामध्ये ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, ज्या महिलांचं वय हे ६५ वर्षांपेक्षा कमी असेल त्याच महिला या योजनेसाठी पात्र असतील अशा काही अटी होत्या, मात्र अनेक ठिकाणी पात्र नसलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं.
तसेच गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. योजना थांबणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट ती सुरूच राहणार आहे”. यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, या योजनेतून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील ६५ वर्षांखालील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, काही ठिकाणी पात्रतेशिवाय लाभ घेणाऱ्यांची नावे आढळल्याने सरकारने अलीकडेच लाभार्थ्यांचा फेरआढावा सुरू केला होता. यामुळे योजना थांबणार असल्याची भीती निर्माण झाली होती.
शिंदे यांनी मेळाव्यात बोलताना महिलांच्या या योजनेवर कोणतेही संकट नसल्याचं ठामपणे सांगितलं. त्यांनी सांगितलं की, “लाडकी बहीण ही योजना सरकारची महिलांना दिलेली बांधिलकी आहे. गरीब कुटुंबातील बहिणींना आर्थिक आधार देण्याचा आमचा उद्देश आहे आणि तो कायम राहील.” त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
मात्र, या घोषणेसोबतच शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल देखील केला. “उद्धव ठाकरे यांनी एका खुर्चीसाठी सर्व काही गमावलं. आपल्या पक्षातील नेत्यांवर कारस्थान करून ते कटप्रमुख बनले आहेत, पक्षप्रमुख नाहीत, असे टोमणे त्यांनी लगावले.
त्याचबरोबर शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “फडणवीस वरून खाली आले, पण उद्धव तुम्ही घरात बसून वर गेलात. तुमच्यासारखा रंग बदलणारा नेता मी कधीच पाहिला नाही,” असा आरोप शिंदेंनी केला.
विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत असून, ती बंद होण्याच्या अफवा पसरवत असल्याचं शिंदे यांनी सूचित केलं. मात्र, सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि त्यामुळेच ही योजना सुरळीतपणे सुरू राहील, असा त्यांनी पुनरुच्चार केला.