राजकारणातील सर्वात मोठी बातमी! अखेर ठाकरे गट- मनसेची युती, एकत्र येत निवडणूक लढवणार…

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेकदा एकत्र येत असून भेटीगाठी सुरू आहेत. असे असताना आता आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, बेस्ट पतपेढीची ही निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या मनसे कर्मचारी सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यामुळे दोघांचे एकत्र येण्याचे हे पहिले पाऊल आहे. बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेली आहे.
यामध्ये सोसायटी निवडणुकीत ज्या पॅनल ची सत्ता असते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात ताकदवान समजल्या जातात. यामुळे यासाठी ठाकरेंनी ताकद लावली आहे. अशातच सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. मराठी च्या मुद्द्यावर एकत्र आलेले आणि मराठी अस्मितेचा स्वाभिमान असलेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत.
मराठी विजयी मेळावा आणि उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करायला राज ठाकरे एकत्र आले. यामुळे महापालिकाच काय महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतील अशी सर्वसामान्य लोकांची धारणा आहे. तशा घडामोडी देखील सध्या घडताना दिसून येत आहेत.
सध्या बेस्ट मधील ठाकरे बंधूच्या युतीला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे.बेस्टचे बहुतांश कामगार पुढारी, युनियनचे पदाधिकारी बेस्टच्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. तसेच कित्येक पदाधिकारी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. यामुळे एकत्र आल्यास फायदा होणार आहे.
बेस्ट पतपेढी ची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची नांदी आहे. यामुळे ही युती अशीच राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून कार्यकर्त्यांची देखील तशीच भावना आहे. याबाबत येणाऱ्या काळात अजून घडामोडी घडणार आहेत.