महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर शरद पवार घेणार होते मोठा निर्णय…

पुणे : अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेमध्ये आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारविलीनीकरणानंतर महत्त्वाचा निर्णय घेणार होते, अशी नवी माहिती पुढे आली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांदरम्यान अनेक नेत्यांनी वेगवेगळे दावे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना विलीनीकरणानंतर अमोल कोल्हेयांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकली असती, अशी माहिती दिली होती. ही बाब स्वतः अमोल कोल्हेंना माहिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
तसेच, १२ तारखेला दोन्ही गटांच्या एकत्र येण्याची अधिकृत घोषणा होणार होती, असा खुलासा स्वतः शरद पवार यांनी केला होता. रोहित पवार यांच्या विधानानंतर अमोल कोल्हे यांनीही माध्यमांशी संवाद साधताना आणखी एक महत्त्वाचा दावा केला. मंत्री छगन भुजबळ यांना विलीनीकरणानंतर राज्यसभेवर पाठवण्याचा विचार होता, असे त्यांनी सांगितले.

सध्या सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याची चर्चा असताना, भुजबळ यांसारखा अभ्यासू आणि अनुभवी नेता वरिष्ठ सभागृहात असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त झाले होते. या संदर्भात अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचेही कोल्हे यांनी नमूद केले. विलीनीकरणानंतर भुजबळ यांना राज्यसभेत संधी मिळू शकते, असे अजित पवार यांनी संभाषणादरम्यान सूचित केल्याचा दावा त्यांनी केला.
शरद पवार यांचा राजकारणातून अलिप्त राहण्याचा विचार…
मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक मोठा मुद्दा समोर आला आहे. दोन्ही गटांचे विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर शरद पवार राजकारणातून अलिप्त राहण्याचा विचार करत होते, अशी माहिती मिळत आहे. सक्रिय राजकीय भूमिकेपेक्षा सामाजिक कार्यात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा मानस होता, असे सांगितले जात आहे.
विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व सूत्रे अजित पवार यांच्या हाती सोपवण्याची तयारी होती, असेही समजते. त्याचवेळी शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला असला तरी त्यांनी पुन्हा राज्यसभेत जावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती, अशीही माहिती पुढे आली आहे.