मोठी बातमी! पूजा खेडकर प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, नेमकं घडलं काय?

पुणे : बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी केलेल्या अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पूजाचे वडील दिलीप खेडकर यांचा ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखे याला धुळे येथून अटक करण्यात आली आहे.

गेल्या सहा दिवसांपासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे हे फरार होते. नवी मुंबईतील रबाले पोलिसांनी आरोपी ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखे याला सिंदखेड, धुळे येथून ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस आयुक्त राहुल धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंखेला २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात अजूनही दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर आणि एक अज्ञात आरोपी यांचा शोध सुरू आहे, त्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेली नाही.

ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मुलुंड-ऐरोली मार्गावर घडली. येथे सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH १२ RP ५००० क्रमांकाच्या लँड क्रूझर गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर लँड क्रूझरमधून उतरलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले, असा आरोप आहे. ट्रक चालकाने ही घटना तात्काळ मालक विलास ढेंगरे यांना कळवून रबाळे पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी MH १२ RP ५००० क्रमांकाच्या गाडीचा शोध सुरू केला. तपासामध्ये ही गाडी पुण्यातील बाणेर परिसरात एका बंगल्यासमोर उभी असल्याचे आढळून आले. हा बंगला बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालकीचा असल्याचे उघड झाले.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस खेडकर कुटुंबीयांच्या बंगल्यावर पोहोचले असता, दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर फरार झाल्याचे समोर आले आहे.
