‘ लाडकी’ वरून वातावरण तापणार; निवडणूक आयोगाकडून सरकारला थेट सवाल,आज खुलासा करण्याचे आदेश

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुका तोंडावर असताना लाडकी बहीण योजनेंतर्गत दोन महिन्यांचे पैसे निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला बँक खात्यात सरकार जमा करणार असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने महायुती सरकारला थेट विचारणा केली आहे.

महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात अशा प्रकारचा हप्ता जमा करणे हा आदर्श आचारसंहिता भंग आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.काँग्रेसच्या दाव्याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना सोमवारी याबाबतची वस्तुस्थिती काय ते स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी आयोगाला शनिवारी एक पत्र देऊन दावा केला होता की, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ असे २ महिन्यांचे ३ हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार १४ जानेवारीला म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी टाकणार आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. महिलांना हे एकप्रकारे मतदानासाठीचे प्रलोभन आहे, तेव्हा आयोगाने सरकारला तसे करण्यापासून रोखावे. त्यावर आता सरकार काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच महायुती सरकारने मतदारांना प्रभावित करण्यासाठी लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा घाट घातल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. लाडकी बहीण ही राज्य सरकारची सुरू असलेली योजना आहे आणि निवडणूक आचारसंहितेत अशा योजना येत नसतात. त्यामुळे काँग्रेस कितीही म्हणत असली तरी आमच्या लाडक्या बहिणींना निधी हा दिलाच जाईल. असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला आहे.