वातावरण तापलं! तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील संशयित आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांचा हल्लाबोल

धाराशिव: गेल्या काही दिवसापासून तुळजापूर ड्रग्ज प्रकरण चांगलंचं चर्चेत येत आहे.या प्रकरणातील संशयित आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याला आता भाजपमध्ये प्रवेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या उपस्थितीत या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर हा जामिनावर सध्या बाहेर आहे. तुळजापूर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.यानंतर विरोधकांकडून भाजपवर तीव्र टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
ड्रग्स प्रकरणातील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे.तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपी असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये ड्रग्जचा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही तीव्र शब्दांत भाजपवर हल्लाबोल केला आहे.तुळजापूर शहराला बदनाम करणारे आणि तरुण पिढीचा नाश करणारे लोक आता भाजपच्या छत्राखाली गेले आहेत. हे तुळजापूरकरांनी लक्षात ठेवा, यांना आता मतदानातून धडा शिकवण्याचे आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.
