वातावरण तापलं! जयंत पाटलांवर पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य, शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन अन…

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. त्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा अपमान आहे, त्यांनी टिकेची मर्यादा ओलांडल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटत आहेत.आता पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दांसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर झालेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी पवार गटामध्ये मोठी नाराजी आहे, प्रचंड आक्रोश आहे, त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावला. “अशी टीका करणं योग्य नाही, बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, असं पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.पडळकरांवरील कारवाईबाबात शरद पवार गट आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला. या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यावरून आता राजकारणात मोठं वादगं निर्माण झालं आहे.
पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे, ते एकमेकांवर टीकाही करत असतात, पण पडळकर यांनी टीका करताना अतिशय खालच्या थराची भाषा वापरली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते, कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.