वातावरण तापलं ; संजय राऊतांनी सुप्रिया सुळेंना सुनावले, कोणत्या मुद्यावरून संतापले?

मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आता युती-आघाडीसाठीच्या जोर बैठकांना जोर आला आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना खडेबोल सुनावले आहेत.
संजय राऊत यांनी म्हटले की, ईव्हीएममध्ये घोटाळे आहेत. सुरुवातीच्या काळात सुप्रिया सुळे देखील ईव्हीएम विरोधात होत्या. सोयीनुसार भूमिका घेता येत नाही आणि बदलता येत नाही. भूमिकेवर ठाम राहायलं हवं. सत्याची लढाई भरकटली जाऊ नये असे त्यांनी म्हणत सुप्रिया सुळे यांना सुनावले आहेत.
काही दिवसांपूर्वी संसदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएमवर आपण शंका घेणार नसल्याचे म्हटले होते. मी स्वत: ४ वेळेस ईव्हीएमने झालेल्या मतदानावर विजयी झाले. त्यामुळे आपण बोलणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

राऊत म्हणाले, ईव्हीएममध्ये घोटाळे आहेत, राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. लोकांच्या मनात संभ्रम तयार होईल आणि संघर्षाची धार कमी होईल अशा भूमिका घेऊ नयेत. सत्य आम्हाला माहीत आहे, सत्याची लढाई अशी भरकटली जावू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीच्या मुद्यावर भाष्य केले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आल्याने उत्साह आहे. या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत, असेही राऊत यांनी सांगितले. मराठी अस्मितेची शेवटची लढाई आहे. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाने उतरावं असं आवाहनही त्यांनी केले आहे.
