आयटी बॉम्बेवरून वातावरण तापलं ; केंद्रीय मंत्र्यांना राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले.

मुंबई : आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान- तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात. ‘मला आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केलं नाही, याचा आनंद आहे.’, असे विधान जितेंद्र सिंह यांनी केले होते. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी बॉम्बेबाबत केलेल्या विधानाचा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आपली मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दलची गेल्या अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरूवात केली असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी जितेंद्र सिंह यांना झापलं आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंची सोशल मीडियावरील पोस्ट काय?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘ केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बाँबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे!’

जितेंद्र सिंह यांनी हे विधान वरिष्ठांची शाबासकी मिळवण्यासाठी केल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की,’खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून… पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यांपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.’
मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे! तेव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच! आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं!’, असे आवाहन राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी नागरिकांना केले आहे.
