स्वारगेट बसस्थानक परिसरात वातावरण तापलं! तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात..

पुणे : पुण्यामधील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकामध्ये मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेटमधील पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने फसवून २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. यामुळे पुण्यासह राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी त्यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत देसाई यांना ताब्यात घेतले आणि पोलीस व्हॅनमध्ये बसवले.
यानंतर देसाई अधिकच आक्रमक झाल्या आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तृप्ती देसाई यांनी पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त करत विचारले, लोकशाहीत आवाज उठवायचा अधिकार नाही का? मला कशासाठी अटक करताय? आरोपीला अटक करा!, त्या पोलीस व्हॅनमध्ये असतानाही त्यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
दरम्यान, देसाई यांनी सरकार आणि पोलिसांवर जोरदार टीका करत पुढे म्हटले, पुण्यातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आरोपीला अटक झाली नाही, ५० तास उलटले तरी सरकार निष्क्रिय आहे.
आता राज्यात नेमकं काय चाललंय, हे विचारण्यासाठी आम्ही मंत्री योगेश कदम यांना भेटायला आलो होतो. पण त्यांनी भेट न दिल्यामुळे आम्ही त्यांच्या गाडीचे दरवाजे वाजवले. त्यासाठी आम्हाला अटक केली जाते, पण आरोपी मात्र मोकाट फिरतो!