लोकशाहीच्या व्याख्येची भुरळ थेट मुख्यमंत्र्यांना ; चिमुकल्याचे फोनवरुन तोंडभरून कौतुक, उपचारही करणार …!

मुंबई : लोकशाहीची आगळी वेगळी व्याख्या सांगून महाराष्ट्राच्या मनात घर करणा-या जालन्याच्या चिमुकल्याची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून कार्तिक वजीरला व्हिडीओ कॉल करुन त्याची विचारपूस केली गेली. कार्तिकला दृष्टीबाधा असल्याने त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात मोफत उपचार करुन देण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले.

दरम्यान देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताकदिनी लोकशाही म्हणजे काय आणि आपल्या जीवनात क्षणोक्षणी लोकशाही कामी येते, हे कार्तिकने मिश्किल भाषेत सांगतानाचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला. काही तासांत ६ वर्षाचा चिमुकला कार्तिक महाराष्ट्रात लोकप्रिय झाला.

चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा नेमका आहे कोण आहे, कुठला आहे, त्याचे शिक्षक कोण आहेत? असे प्रश्न नेटक-यांकडून उपस्थित झाले होते. कार्तिक जालिंदर वजीर असं या मुलाचे नाव आहे. मुळचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवलगाव इथे पहिल्या इयत्तेत तो शिकतो. त्याला दृष्टीबाधा आहे. फार लांबचं त्याला दिसत नाही. शाळेतही त्याला पहिल्या बेंचवर बसावं लागतं.

कार्तिकचा दृष्टीबाधेचा त्रास लक्षात घेऊन आज मुख्यमंत्री कार्यालयातून वजीर कुटुंबियांना व्हिडीओ कॉल केला गेला. मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख तसेच एकनाथ शिंदे यांचेओएसडी मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदतकक्षाच्या मराठवाड्याचे प्रमुख दादासाहेब थेटे यांना कळवून कार्तिकच्या उपचारासाठी पूर्ण जबाबदारी घेतली.
