सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती करण्यासाठी तडजोडीअंती २ लाखांची लाच घेताना तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रंगेहाथ पकडले; दौंड तालुक्यात घडला प्रकार..

लोणी काळभोर : सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती करण्यासाठी तडजोडीअंती २ लाखांची लाच घेताना देवडी (ता. दौंड) येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रंगेहाथ पकडले आहे.

याप्रकरणी दीपक नवनाथ आजबे (वय ३९, तलाठी सजा देलवडी) यांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांनी २०१२ साली मौजे देलवडी (ता. दौंड) येथे गट क्रमांक १५०६ मधील ०.०६ आर क्षेत्र खरेदी केलेले असून तसा महसूल दप्तरी ७/१२ वर नोंदी झालेल्या आहेत. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये तक्रारदार यांनी जमिनीचा संगणकीय ७/१२ उतारा काढला असता त्यावर तक्रारदार यांचे नावे ०.०६ आर ऐवजी ०.०३ आर क्षेत्र नोंद दिसून आल्याने तक्रारदार यांनी संगणकीय ७/१२ वर दुरुस्ती होणेकारिता ॲगष्ट २४ रोजी तलाठी दीपक आजबे यांचेकडे लेखी अर्ज केला होता.

त्यानंतर वेळोवेळी तक्रारदार हे सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती होण्याकरीता आलोसे यांची वारंवार भेट घेत होते तेव्हा आलोसे हे तक्रारदारांना काम करून देण्याचे आश्वासन देत होते. सप्टेंबर २०१५ मध्ये तक्रारदार यांच्या संगणकीय ७/१२ उताऱ्यावर दुरुस्ती करण्याकरीता त्यांनी तक्रारदारांकडे हस्तलिखित ७/१२ उताऱ्याची प्रत मागितली तेव्हा तक्रारदार यांनी ती हस्तलिखित प्रत तहसीलदार कार्यालयातून प्राप्त करून तलाठी आजबे यांना दिली त्यावेळी त्यांनी तक्रारदाराच्या संगणकीय ७/१२ वर दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे ४ लाख रुपयाची मागणी केल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी ए.सी.बी. कार्यालय, पुणे येथे दिली होती.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ७ व १० नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीबाबत पडताळणी कारवाई केली असता ७ नोव्हेंबर रोजीच्या पडताळणीमध्ये आजबे यांनी तक्रारदाराच्या वरील कामासाठी तक्रारदाकडे ३ लाख रुपये लाचेची मागणी करून २.५ लाख स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले तसेच १० नोव्हेंबर रोजी पडताळणी मध्ये यांनी २.५ लाखाची मागणी करून तडजोडीअंती २ लाख स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सोमवार (१० नोव्हेंबर) रोजी पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे व शैलजा शिंदे यांनी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी दीपक आजबे यांनी’ साईराज कॅन्टीन’ (केडगाव चौफुला ता. दौंड) येथे तक्रारदाराकडून २ लाख रुपयाची लाच ५.४५ वाजता स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र, पुणे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
