राज गर्जनेनंतर प्रशासन रात्रीच समुद्रात घुसले ! माहिमच्या कथित मजारवर शिंदे सरकारचा बुलडोझर…!
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यात माहिमच्या समुद्रात झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत व्हिडिओ दाखवण्यात आला. हा मजार काढणार नसाल तर या मजारसमोरच गणपती मंदिर उभारण्याचा इशारा देताच त्याच रात्री प्रशासनानं समुद्रात घुसून मजावर धडक कारवाई केली आहे.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रातोरात प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली. याठिकाणची जागा महापालिका नव्हे तर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्यारित असल्याने ही कारवाई त्यांच्याकडून केली जाईल असं मनपाने सांगितले. गुरुवारी सकाळी सकाळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी जागेचे मॅपिंग करण्यात आले. त्यानंतर या जागेचे कुठे नोंद आहे का याची पडताळणी करण्यात आली. मात्र ही मजार ६०० वर्ष जुनी असल्याची नोंद असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली. परंतु सदर जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचं प्रशासनाला आढळून आले.
भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला .त्याचसोबत जेसीबीने सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवण्यास आले आहे. संपूर्ण ही जागा पूर्ववत करण्यात आली आहे. रात्री उशिरा सभा संपल्यानंतर त्यानंतर काही जणांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्यामुळे कुणालाही तिथे जाता आले नाही. सकाळी साडेसातच्या सुमारास प्रशासनाने मनुष्यबळ वापरून याठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आला आहे.