खुनाचा प्रयत्न करुन आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने केले जेरबंद…

लोणी काळभोर : खुनाचा प्रयत्न करुन गेली आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी राहुल नथु सोलंकी (या. घोरपडे वस्ती, कदमवाकस्ती, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सविस्तर हकिकत अशी की कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीत नऊ जणांनी प्रेमविवाहाच्या कारणावरून एका तरुणाच्या वडिलांवर गज मारून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल असून, त्यावेळी आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु तेव्हापासून सोलंकी फरार होता.
गुरुवार (११ नोव्हेंबर) रोजी पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले व बाळासाहेब सकटे हे गस्त घालत असताना त्यांना गेल्या ८ वर्षापासून फरार असलेला सोलंकी हा लोणी स्टेशन परिसरातील खोले वस्ती नजीकच्या एमआयटी कॉर्नर येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली.

सदर बातमीची खातरजमा करण्यासाठी तेथे सापळा रचला व त्याला जेरबंद करण्यात आले. सोलंकी याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाई साठी त्याला लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

