पंजाबात तिहेरी हत्याकांड घडविणाऱ्या सातकुख्यात आरोपींना छत्रपती संभाजीनगरात अटक !
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी आज सकाळी एक धाडसी मोहीम राबवत फिरोजपूर पंजाब येथील तिहेरी हत्याकांडात सहभागी असलेल्या सात खतरनाक आरोपींना समृद्धी महामार्गावर कारवाई करत ताब्यात घेतले. अवघ्या काही दिवसांवर लग्न असलेल्या तरुणी आणि इतर दोघांची हत्या करून आरोपींनी पंजाबमधून पलायन केले होते.
पहाटे ३ वाजता पंजाब पोलिसांच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कृती दल (एजीटीएफ अॅण्टी गँगस्टर टास्क फोर्स) अतिरिक्त महासंचालक प्रमोद बान यांनी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना हत्याकांडातील सहा आरोपी नांदेड येथून समृद्धी महामार्गावरुन मुंबईकडे जात असल्याची माहिती दिली. आरोपींबाबत माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील १० अधिकारी आणि ४० कर्मचा-यांची टीम बुलेटप्रुफ जॅकेटसह सज्ज झाली.
आरोपी शस्त्रधारी असतानाही दक्ष पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला. सकाळी ५. ४५ मिनिटांनी धाडसी कारवाई करत भरधाव वेगात कारमधून(एमएच २६ एसी ५५९९) जाणा-या पंजाब येथील सहाही आरोपींच्या पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या.