शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेचा २०वा हप्ता आज खात्यात जमा होणार, पैसे आले की नाही असं करा चेक..

पुणे : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहभागी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, या योजनेचा २०वा हप्ता आज २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केला जाणार आहे.

या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ₹२००० ची रक्कम थेट जमा केली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण आणि अचूक असल्यासच त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे अनेकांनी आपली माहिती आधीच अपडेट केली होती. ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे, त्यांना मात्र यावेळी हप्ता मिळणार नाही.पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना ₹6000 ची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.

यातील १९वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दिला गेला होता. मात्र, पुढील हप्ता जूनमध्ये अपेक्षित असतानाही जुलैअखेरपर्यंत रक्कम जमा झाली नव्हती, त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत होते.
सरकारने विलंबाबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले की, यावेळी डेटा पडताळणी आणि बँक खात्यांशी संबंधित प्रक्रिया अधिक वेळखाऊ ठरल्या. आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, २ ऑगस्टपासून हप्ता वाटप सुरू करण्यात येत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना आपली लाभार्थी स्थिती pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासता येते. यासाठी त्यांना आपला मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकावा लागतो. तिथे ‘Beneficiary Status’ पर्यायावर क्लिक करून सविस्तर माहिती मिळते.