ठाकरेंची डोकेदुखी वाढली ; मातोश्रीच्या अंगणात दोन आमदारांचा वाद पेटला, काय आहे कारण?

मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल असताना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता सगळ्याच राजकीय पक्षांसमोर बंडखोर उमेदवारांचे आव्हान समोर आलं आहे. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे मातोश्रीचे निकटवर्तीय असलेल्या दोन आमदारांच्या वादातून ही बंडखोरी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीसाठी वांद्रे विभागात शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
विभाग प्रमुख आमदार अनिल परब यांच्याकडून जागावाटपाच्या वेळी माजी नगरसेवक वायंगणकर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू होती. मात्र, ऐनवेळी पक्षाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शास्त्री यांचं नाव पुढे ढकले आहे. अखेर शास्त्री यांनाच अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे.या उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात तीव्र मतभेद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान उमेदवारीवरून ठाकरेंची डोकेदुखी वाढली असून या वादानंतर अनिल परब रात्री उशिरा मातोश्रीवरून तडकाफडकी निघून गेले.त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी अधिकच उघड झाली आहे.त्यानंतर काल आमदार वरुण सरदेसाई यांनी अनिल परब यांची घेतलेली भेटही या प्रयत्नांचा भाग असल्याची चर्चा आहे. वायंगणकर हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने, ही भेट नाराजी कमी करण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

तसेच अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात कोणतेही वाद नाहीत, असा संदेश देण्याचाही प्रयत्न या भेटीतून करण्यात आला असावा, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता, या भेटीनंतर मातोश्रीच्या अंगणात झालेली बंडखोरी निवळणार का, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.