ठाकरेंनी डाव टाकला;ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणूकीसाठी शिवसेना शिंदे गट जोमाने तयारीला लागला असताना शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख दादा पवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर दादा पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर मला घरी आल्यासारखं वाटत आहे, आम्हाला जी आश्वासन शिवसेना शिंदे गटात जाताना देण्यात आली होती, त्यापैकी एकही पूर्ण झालं नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा स्वगृही आलो आहोत. आता मरेपर्यंत शिवसेना ठाकरे गट सोडणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी केला.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या वेळी भाजपात मोठ्या प्रमाणात नेत्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला, त्यावरून शिवेसना शिंदे गटानं नाराजी देखील व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाला ठाकरे गटाने मोठा धक्का दिला आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपानं शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.