मुंबईत ठाकरे गटाला खिंडार ; बड्या महिला नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

मुंबई : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी न मिळाल्यामुळे ठाकरे गटातील इच्छुक उमेदवार आणि महिला पदाधिकाऱ्यांनीं तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.

भांडुपमध्ये नारज झालेल्या माजी नगरसेविका दिपाली गोसावी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठे खिंडार पडला आहे.दिपाली गोसावी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल असं सांगण्यात आलं. परंतू पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याऐवजी सुरेश शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्या नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

भांडुपमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वार्ड क्रमांक १०९ मध्ये नाराज झालेल्या दिपाली गोसावी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आता याच वॉर्डमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश शिंदे आणि अपक्ष उमेदवार दिपाली गोसावी यांच्यामध्ये काँटे की टक्कर होणार आहे.
